"रिंगा रिंगा'मध्ये नुसतीच मोठी "स्टारकास्ट' नाही, तर उत्तम अभिनेते आणि तंत्रज्ञ दोन्ही एकत्र आलेत. सोनाली कुलकर्णी, भरत जाधव, अंकुश चौधरी, अजिंक्य देव आणि संतोष जुवेकर या कलाकारांबरोबरच, गीतकार गुरू ठाकूर, संगीतकार अजय-अतुल, संकलक अमित पवार, पटकथा-संवाद अमोल शेडगे अशा नावाजलेल्या मंडळींनीही या चित्रपटासाठी काम केलंय. या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या "इमेज'बाहेर जात कोणत्या भूमिका साकारल्यात आणि कोण कोणाला "रिंगा रिंगा' म्हणतंय हे कळण्यासाठी तरी हा चित्रपट सगळ्यांनी बघायलाच हवा!
मूळच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका असणाऱ्या कांचन सातपुते यांनी मराठी चित्रपटांच्या प्रेमाखातर निर्मिती क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं; पण चित्रपट किंवा मालिकानिर्मितीत येण्याअगोदर त्याच्या "पोस्ट प्रॉडक्शन'ची सुविधा असायला हवी, या विचारातून त्यांनी "निषाद ऑडिओ व्हिज्युअल्स' नावानं १६०० स्क्वेअरफूट जागेवर अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा स्टुडिओची उभारणी केली. मराठी चित्रपटातील तोचतोचपणा जाऊन काही वेगळ्या पद्धतीचा चित्रपट करायची त्यांची इच्छा पूर्ण झाली ती "चेकमेट'च्या निमित्तानं. नावापासून ते सादरीकरणापर्यंत आणि प्रसिद्धीपासून ते वितरणापर्यंत आपल्या वेगळेपणाचा ठसा या चित्रपटाने उमटवला. त्यानंतर त्यांनी "बोक्या सातबंडे'ची निर्मिती केली. आता पुन्हा त्यांनी "रिंगा रिंगा' या चित्रपटाची निर्मिती केलीय. या चित्रपटाविषयी बोलताना कांचनजी म्हणाल्या, ""रिंगा रिंगा' हा एक "सस्पेन्स थ्रिलर' चित्रपट आहे. "सस्पेन्स' समजल्यावर पुढच्या चित्रपटाची मजाच राहत नाही; पण "रिंगारिंगा'मधल्या "सस्पेन्स'ची मजाच वेगळी आहे. प्रत्येकवेळी तो "सस्पेन्स' नव्यानं अनुभवता येईल. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, अजिंक्य देव, भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष जुवेकर अशी तगडी "स्टारकास्ट' आहे.''
चार मुलांच्या गॅंगमध्ये एकटी मुलगी असलेली सोनाली कुलकर्णी "रिंगारिंगा'बद्दल बोलताना म्हणाली, ""चार हिरो आणि एकच हिरॉईन असं मराठी चित्रपटात बहुधा पहिल्यांदाच होत असावं. माझ्या चित्रपटातले चारही हिरो खूप छान आहेत. अजिंक्य आणि माझी आधीपासूनच खूप चांगली मैत्री आहे. भरत जाधवमधील अभिनेत्याच्या मी प्रेमातच पडलेय. त्यानं त्या चित्रपटात आपल्या "इमेज'बाहेर जात सगळ्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिलाय. अंकुशबरोबरचा माझा हा दुसरा चित्रपट असून, आमच्या दोघांच्यात छान "रॅपो' आहे. संतोषही माझा खूप चांगला मित्र झालाय. त्याच्याशी मी जगातल्या कुठल्याही विषयावर कितीही बोलू शकते.''
भरत या चित्रपटात पहिल्यांदाच एक "डॅशिंग कॅरेक्टर' रंगवतोय. आपल्या भूमिकेबद्दल तो म्हणाला, ""मी खूप दिवसांपासून काहीतरी वेगळं करायच्या विचारात होतो, या भूमिकेमुळे मला ती संधी मिळालीय. यात मी एका राजकीय नेत्याच्या "बॉडीगार्ड'ची भूमिका करतोय. यासाठी मी पहिल्यांदाच माझ्या "फिजिक' व "बॉडीलॅंग्वेज'वर खूप मेहनत घेतलीय. सोनालीसारख्या चांगल्या अभिनेत्रीबरोबर काम करायची संधी या चित्रपटानं मला दिली याचा आनंद आहेच.''
या चित्रपटात संजय जाधव यांनी एक गाणं उलट चित्रित केलंय. म्हणजेच या गाण्यात सोनाली आणि अंकुश उलट चालतात. या गाण्याबद्दल सोनालीला विचारलं तेव्हा तर तिला हसू आवरता येत नव्हतं. ती म्हणाली, ""पडद्यावर आम्ही चालत असताना बाजूला दोरीच्या उड्या मारणारी मुलगी उलट्या उड्या मारते, असं दिसतं. खड्ड्यात पाय पडल्यावर खड्ड्यातलं पाणी बाहेर उडण्याऐवजी आत जाताना दिसतं. खरं तर बाकी सगळ्यांच्या हालचाली "नॉर्मल' होत्या; पण मी अन् अंकुश उलट्या हालचाली करत होतो. मला तर उलट्या हालचालींची इतकी सवय झाली होती, की इतर दृश्यांच्या चित्रीकरणाच्या वेळीही मी उलट्या हालचाली करायचे.''
या चित्रपटाचं सगळं शूटिंग गोव्यात झालंय. म्हणजे शूटिंगच्या वेळी खूप धमाल केली असणार, असं म्हणताच सोनाली जरा तक्रारीच्या सुरातच म्हणाली, ""नाही ना! मी सोडून बाकी सर्वांनी खूप मजा केली. ग्रुपमध्ये मी एकटीच अशी मुलगी होते, की जिला पार्टीला जायला मिळालं नाही. माझी सकाळी सातची शिफ्ट असली, की पहाटे साडेपाचपासून माझं "वर्कआऊट' सुरू व्हायचं.'' सोनालीचं बोलणं मध्येच तोडत भरत म्हणाला, "...म्हणूनच आम्ही सगळ्यांनी शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सोनालीसाठी "सरप्राईज पार्टी' ठेवली होती. त्या पार्टीत सोनालीने सगळी कसर भरून काढली.'' त्यावर सोनालीनं दुजोरा देत सांगितलं, "मी तर पार्टीतल्या प्रत्येकाबरोबर खूप नाचले!'
प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय जाधवचा हा दुसरा चित्रपट आहे. त्यांच्याबद्दल बोलताना तर भरत आणि सोनाली दोघेही खुलतात. सोनाली म्हणते, ""संजय खूप "सॉलीड' दिग्दर्शक आहे. त्याला प्रत्येक कलाकारांकडून काय हवंय, एखादा शॉट कसा घ्यायचा, याबद्दल तो ठाम असायचा; शिवाय सिनेमॅटोग्राफी व दिग्दर्शन दोन्ही भूमिकेत तो असल्यानं एखादा "सीन' बांधताना तो कसा दिसायला हवा त्यातून त्याला (दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना) काय सूचित करायचं आहे हे ठाऊक असतं. त्याचा फायदा होतो.'' भरत म्हणाला, ""संजय हा खूप कुशल दिग्दर्शक आहे. त्यानं त्याला हवं तसं काम आम्हा कलाकारांकडून खूप छान करून घेतलंय. आमच्या सगळ्यांच्या "लूक'वरही त्यानं खूप मेहनत घेतलीय. इतकं असूनही आमच्यापैकी कोणी काही नवीन सुचवलं, तर आडमुठेपणा न करता तो ऐकून घ्यायचा आणि पटलं, तर योग्य ते बदल करायचा.''
----------------------------------------------------------
'प्रीमियर' आहे मराठीतील एकमेव ग्लॅमर मासिक. वर्गणीदार व्हायचेय? ई मेल करा webeditor@esakal.com वर. Subject मध्ये लिहा Premier आणि मेलमध्ये तुमचा सविस्तर पत्ता.
'आमीर' प्रथमच मराठीत...ऑनलाईन ऑर्डर इथे नोंदवा.