संजय मिस्किन कार्ला, (जि. पुणे) - ''देशभरात राष्ट्रवादीचा विस्तार करताना महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना संधी आणि शहरांचा विकास याकडे पक्षकार्यकर्त्यांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केले. कार्ला येथे पक्षाच्या राष्ट्रीय शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. देशात शांती, समृद्धी आणि प्रगती नांदावी यासाठी पक्ष वचनबद्ध असून या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पक्षाला विस्तार करणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षाचे राष्ट्रीय नेते पी. ए. संगमा, डी. पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर यांच्यासह राष्ट्रीय पदाधिकारी, सर्व प्रदेशाध्यक्ष, आमदार आणि खासदार उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात "राष्ट्रवादी ः आज आणि उद्या' या विषयावर चिंतन करण्यात येत आहे. शिबिरास मोजकेच अडीचशे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार झालेला असला, तरी देशभरात पक्षाच्या विस्ताराला मोठा वाव असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की एकविसाव्या शतकात विकास हाच राजकीय यशाचा प्रमुख पाया आहे. भारतात शहरीकरण झपाट्याने वाढले आहे आणि निम्म्याहून अधिक लोकसंख्या तरुण आहे. त्यामुळे ग्रामीण पातळीवर राष्ट्रवादीचा विस्तार भक्कम असला तरी यापुढे शहरात पक्षाचा विस्तार करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रासह नऊ राज्यांत विस्तारली असून तीन राज्यांत सरकारमध्ये सहभागी आहे. देशातील इतर राज्यांमध्ये राष्ट्रवादीचा विस्तार व्हायचा असेल तर राजकारणासोबतच समाजकारणालाही पक्षातील कार्यकर्त्यांनी अग्रक्रम द्यायला हवा, असा संदेशही पवार यांनी यावेळी पक्षकार्यकर्त्यांना दिला. देशात सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. दारिद्य्र, शिक्षण, दहशतवाद यांसारखी आव्हाने आपल्यासमोर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस केंद्र सरकारचा प्रमुख सहयोगी पक्ष असल्याने देशात धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व बळकट करण्यास हातभार लावत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
मनसेला टोला
आपल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाव न घेता राज ठाकरे यांच्या राजकारणास टोला दिला. देशातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रोपोलिटन वृत्ती वाढीस लागलेली आहे. अनेक जातींचे, धर्मांचे, प्रांतांचे आणि भाषेचे लोक एकत्र राहत असताना राष्ट्रवादीने भाषावाद आणि प्रांतवादावर राजकारण करण्याचे टाळावे, असे सांगत पवारांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला दिला.
महिलांना प्राधान्य तर तरुणांना संधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसने महिला सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच पावले उचलली आहेत, असे स्पष्ट करीत पवार म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारी पाऊल आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस या विधेयकाचे ठामपणे समर्थन करते. महिलांच्या राजकारणातील प्रवेशामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून पक्षवाढीसोबतच महिला सक्षमीकरणाचा उद्देश साध्य केला पाहिजे.
महिलांसोबतच तरुणांनाही देशात मोठी संधी आहे. या विषयी पवार म्हणाले, की सध्याचा तरुण हा आधुनिक आहे. त्याची दृष्टी स्पष्ट असून, विकास आणि पारदर्शकता यावर तरुणांचा विश्वास आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक लोकसंख्या तरुण असलेल्या आपल्या देशात तरुणांच्या सहभागाशिवाय कुठलेही क्षेत्र विकास पावू शकणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ओबीसींना लोकसभेत आरक्षण हवे - भुजबळ
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय शिबिरात आज विषय गाजला तो ओबीसी आरक्षणाचा. लोकसभेत ओबीसींना आरक्षण हवे, अशी सनसनाटी मागणी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात केली. ते म्हणाले, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीसह महानगरपालिकांमध्ये ओबीसींना स्वतंत्र 27 टक्के आरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर लोकसभा आणि विधानसभेमध्ये ओबीसींना स्वतंत्र आरक्षणाचा कोटा असावा. महिला आरक्षण विधेयकात ओबीसी महिलांसाठी तरतूद नसली तरी संसदेत ओबीसींना आरक्षण मिळायलाच हवे. देशात ओबीसींची लोकसंख्या जवळपास 54 टक्के आहे, त्यामुळे मंडल आयोगाचा विचार करून हे आरक्षण द्यायला हरकत नसल्याची पुष्टी भुजबळ यांनी या वेळी जोडली.
भुजबळांच्या या मागणीमुळे ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला. लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना सरसकट आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर सनातन संस्था आणि अभिनव भारत संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही आव्हाड यांनी केली.
-----------------------------------
शरद पवार 'मिस्टर इंडिया'
या शिबिरामध्ये पूर्वेकडील राज्यांतून आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांचे वर्णन वारंवार "दी स्ट्रॉंग मराठा मॅन' असे केले. यावर मणिपूरचे माजी उपमुख्यमंत्री राधा विनोद कोईजाम यांनी कोटी केली. ते म्हणाले, की शरद पवार हे "स्ट्रॉंग मराठी मॅन' आहेतच, पण ते भारताचेसुद्धा स्ट्रॉंग मॅन आहेत. त्यामुळे शरद पवार खऱ्या अर्थाने "मिस्टर इंडिया' आहेत. कोईजाम यांच्या या उद्गारांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
-----------------------------------