सौ. अनिता चोपडा, मार्केट यार्ड

साडेअकरा वाजता तिचाच फोन आला. 'अगं मम्मा,खूप पाऊस येतोय आणि एक कुत्रा इथे खड्ड्यात पडला आहे. दीड-दोन फूटच खड्डा आहे, पण तरीही त्याला उठता येत नाही. तो खूप ओरडतोय.'साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात पाहुणे आलेले. स्वयंपाकाची गडबड. कॉलेजच्या कुठल्या कामासाठी माझी मुलगी मीनल (ती बी.ई. सिव्हिल झाली व सध्या ब्रिटनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे.) बाहेर गेलेली. तिची मी वाट बघत होते. साडेअकरा वाजता तिचाच फोन आला. 'अगं मम्मा, मी जंगली महाराज रोडवर आहे. खूप पाऊस येतोय आणि एक कुत्रा इथे खड्ड्यात पडला आहे. दीड-दोन फूटच खड्डा आहे, पण तरीही त्याला उठता येत नाही. तो खूप ओरडतोय. त्याला बहुतेक खूप त्रास होतोय. मी त्याच्याच जवळ आहे. बरोबर एक मैत्रीणही आहे. (खरं तर ती कुत्र्यांना खूपच घाबरते.) यायला थोडा उशीर होईल.'
मी पाहुण्यांच्या सेवेत अडकले. खरं तर मला तिच्या मदतीची गरज होती, पण ती त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याच्या सेवेत होती.
जेवणं वगैरे सर्व आटोपल्यावर साडेतीन - चारच्या दरम्यान मी तिला पुन्हा फोन केला, तर ती खूपच दुःखी होती. फक्त रडायचीच बाकी होती. कारण तिने त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले; पण यश येईल असं वाटत नव्हतं. त्याला बाहेर काढण्याचा खूपदा प्रयत्न केला, पण तो हात लावू देत नव्हता. त्याला कुठल्या तरी वाहनाने धक्का मारला म्हणून त्याचे मणके तुटले होते. पावसामुळे तो चिंब भिजला होता. त्याला थंडीही खूप वाजत होती. तिच्या गाडीत एक पोते होते ते तिने त्याच्या अंगावर पांघरले. त्याला बिस्किटे खायला दिली तर तो ते पण खात नव्हता. बस्स फक्त करुण नजरेने सारखा तिच्याकडे बघून कण्हत होता. उठण्यासाठी धडपडत होता. आणि त्याची ती धडपड तिला बघवत नव्हती.
त्याला वाचवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. काही संस्थांना फोन केले, पण ते न पटणारी उत्तरं सांगून टाळाटाळ करत होते. कितीतरी डॉक्टरना फोन केले, पण कुणीही लवकर "हो' म्हणत नव्हतं. शेवटी एक डॉक्टर यायला तयार झाले आणि ते आलेही. त्यांनी त्याला इंजेक्शन दिले, पण सांगितले की हा जगणार नाही. तो उठण्यासाठी सारखा धडपडत होता. पण त्याला उठता येणं शक्य नव्हतं. आजूबाजूने लोक येत-जात होते, पण कुणीही थांबत नव्हते.
त्याला बाहेर काढण्यासाठी, वाचवण्यासाठी लेकीने माझ्या खूप प्रयत्न केले, पण ते निरर्थक होते. शेवटी मी तिला सांगितले, "बेटा, तू त्याच्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले, पण आता तू त्याला त्याच्या नशिबावर सोड व देवाजवळ प्रार्थना कर की त्याची लवकर सुटका होऊ दे आणि तू आता घरी ये.''
ती साडेचार वाजता घरी आली. आणि माझ्या गळ्यात पडून खूप रडली. त्या क्षणी खरोखरच मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटला. आणि वाटलं, हाच तर खरा धर्म. दिवसभर ती विना अन्न-पाणी होती. तिला चहा करून दिला आणि अभिमानाने तिच्याकडे बघत राहिले आणि एकदम आठवलं की असंच काही महिन्यांपूर्वी एकतीस डिसेंबरला माझी धाकटी मुलगी पायल संध्याकाळी बाहेर गेलेली होती आणि चौकात सिग्नलवर भीक मागणारी मुले बघून तिला त्यांच्याबरोबर 31 डिसेंबर साजरा करावा वाटला. म्हणून तिने त्यांना प्रत्येकी फुगे व कुल्फी घेऊन दिली आणि ती मुले एवढी खूष झाली की फुगे आणि कुल्फी घेऊन रस्त्याने "हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर' म्हणत पळत सुटली. हे दृश्य बघून लेक माझी किती खूष झाली हे वेगळं सांगायला नको.
तेव्हा नक्कीच म्हणावेसे वाटतं,
'अभिमान आहे मला माझ्या मुलींचा'.....