थोरांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यातच धन्यता मानणार का?
सकाळ वृत्तसेवा
Monday, March 15, 2010 AT 12:15 AM (IST)
पुणे - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साठ वर्षांहून अधिक काळ उलटला; मात्र अद्याप सुराज्य निर्माण झाले नाही. केवळ जयंती, पुण्यतिथी साजरी करणे आणि जयजयकार करण्यातच आपण धन्यता मानणार का, इतिहासातून काही धडा घेणार की नाही, असा सवाल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला.
"ऐतिहासिक कागदपत्रे' या ग्रंथाचे प्रकाशन पुरंदरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी भूषविले. लेखक राजाराम देशपांडे, डॉ. श्री. मा. भावे, डॉ. सदाशिव शिवदे, दाजीकाका गाडगीळ आदी यावेळी उपस्थित होते. ""छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्य आणि सुराज्याचे स्वप्न पाहिले. पस्तीस वर्षात त्यांनी ते पूर्णही केले. त्यांच्यासोबत सर्वच जातींचे लोक होते,'' असे ते म्हणाले. शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सुराज्य स्थापले, पण आज देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली तरी सुराज्य निर्माण करता आलेले नाही, अशी खंत पुरंदरे यांनी व्यक्त केली.
जयंती, पुण्यतिथी साजरी करणे आणि जयजयकार करण्यापलीकडे आपण काहीच करीत नाही. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत. एका स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असलेली ताकद त्या काळच्या एकाही संस्थानिकाकडे नव्हती. तरीही त्यावेळी सुराज्य नांदत होते. आपण इतिहासातून धडा घेतला पाहिजे, असे पुरंदरे यांनी स्पष्ट केले.
देगलूरकर म्हणाले, ""इतिहासाचे वाचन कोणीही करीत नाही, केले तरी त्याचे स्मरण करीत नाही. त्यामुळेच आपल्या देशावर संकटे आली आहेत.'' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला कुलकर्णी यांनी केले, तर आभारप्रदर्शन मेधा सुदामे यांनी केले.