रेल्वेप्रवासात चाकूने वार करून कोलकता येथील एकाची हत्या
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 17, 2010 AT 12:15 AM (IST)
अकोला - धावत्या रेल्वेतच चाकूचे वर्मी घाव घालत कोलकता निवासी एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मुंबई-हावडा लोहमार्गावर भुसावळजवळ घडली. याप्रकरणी अकोला रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू असल्याचा दावा केला असला; तरी खुनामागील नेमके कारणच उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.
पश्चिम बंगालमधील उन्नर पोलिस ठाण्यांतर्गत पाईकवाला बशीराहाट (कोलकता) निवासी महम्मद असरफअली एलेबक्श अली मंडल (वय 35) हा व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाला होता. मुंबईच्या ब्रांदा पूर्व भागात त्याचे स्वतःचे घर असून, एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय गत 15 वर्षांपासून तो करीत होता, अशी माहिती त्याचा चुलत भाऊ व याप्रकरणातील तक्रारकर्ता महम्मद अन्सार अली इमामबक्श मंडल याने दिली. मध्यंतरी महम्मद असरफअली याने सहा महिने गावी घालविले होते, तत्पूर्वी त्याने त्याच्याकडील चारपैकी तीन एम्ब्रॉयडरी मशिन विकल्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतत त्याने त्याच्याकडील एकमेवर एम्ब्रॉयडरी मशिनही विकली व राहते घर भाडेतत्त्वावर दिले. मुंबईतील व्यवसाय अचानक गुंडाळत त्याने गावीच उदरनिर्वाहाकरिता नवा पर्याय शोधण्याचा विचार केला होता. त्यानुसार सोमवारी (ता.15) रात्री ब्युटी खातून (वय 15) व तनुजा (वय 14) या दोन भाच्या व स्वतः महम्मर असरफअली असे तिघे ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्स्प्रेसने कोलकात्ताकडे निघाले होते. मामा-भाची एस-दहा या आरक्षित बोगीतील 57-68 बर्थवर होते तर चुलत भाऊ महम्मद अन्सार अलीसह कोची (वय 22), मोहसीन (वय 23), मुजफ्फर (वय 20), अब्दुल रशीद (वय 20) हे पाच नातेवाईक एस-आठ या बोगीत होते. मुंबईच्या कुर्ला स्थानकावरून सोमवारी (ता.15) रात्री 8ः35 वाजता सुटलेली ज्ञानेश्वरी एक्सप्रेस मंगळवारी (ता. 16) भुसावळ सोडल्यानंतर पहाटे 4ः25 वाजता आचेगाव स्थानकावर पोहोचली. यावेळी महम्मद अशरफअलीसोबत असलेल्या त्याच्या भाच्यांना जाग आली. मामा अशरफ हे पोटाला हात लावलेल्या अवस्थेत बोगीत बसलेले व त्यांच्याभोवती रक्ताचे थारोळ साचल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. तत्काळ चेन ओढत तनुजा व ब्युटीने रेल्वे थांबविली. तिकीट तपासणीस व कर्तव्यावरील गार्डने बोगीत धाव घेत पोलिसांनाही
सूचना दिली. एस -आठ बोगीतील महम्मद अशरफच्या नातेवाइकांनाही बोलावण्यात आले. प्रकरणाची गंभीरता पाहता "ज्ञानेश्वरी'च्या गार्डने अकोला रेल्वेस्थानकावरील स्टेशन मास्तरशी वायरलेसवरून संपर्क साधत घटनेची माहिती दिली व रुग्णवाहिका तयार ठेवण्यास सांगितले. पहाटे 6ः20 वाजताच्या सुमारास अकोला स्थानकावर रेल्वे पोहोचताच रेल्वे पोलिसांनी महम्मद अशरफअली याला उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु तोवर फार उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
मृताच्या पोटात तीक्ष्ण हत्याराचे दोन घाव असून आतडीच बाहेर काढण्यात आली. खुनामागील नेमक्या कारणाचा खुलासा होत नसल्याने पोलिसांनी मृतासोबत असलेल्या तनुजा व ब्युटी या नागपूरपर्यंत पोहोचलेल्या दोन्ही भाच्यांना परत बोलावले. त्यांच्याकडूनही काहीच उलगडा होत नसल्याने याप्रकरणी तपासकामी रेल्वे ठाणेदार अनिल जुमळे व कर्मचारी रात्री उशिरा मुंबईकडे मार्गस्थ होण्याची माहिती आहे.