Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

इंधन वाचविण्यासाठी पायलटही मागतात "इकॉनॉमी हाईट'
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 17, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: pilot,   oil,   nagpur,   vidarbha

दयानंद पाईकराव
नागपूर - जमाना "कॉस्ट कटिंग'चा आहे. शासकीय वाहतूकही त्यातून सुटली नाही. हल्ली तर डिझेल कमी लागावे म्हणून एसटी बसेसचे "स्पीड लॉक' केले जातात. आपणही पेट्रोल वाचविण्यासाठी नाना क्‍लृप्त्या योजतो. आता विमान वाहतुकीनेही इंधन बचतीचा मूलमंत्र स्वीकारला आहे. वैमानिक पेट्रोल वाचविण्यासाठी कमी उंचीवरून विमान चालविण्याचा हट्ट नियंत्रण कक्षाकडे करीत "इकॉनॉमी स्पीड' मागतात. परंतु, या साऱ्या विमानांच्या संचालनात नियंत्रण कक्षाला डोळ्यात तेल घालून तारेवरची कसरत करावी लागते हे विशेष.

साधारणतः विमानाला एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून 31 ते 40 हजार उंचीपर्यंत भरारी घेण्याच्या सूचना देण्यात येतात. कुठल्या मार्गाने कुठले विमान किती फुटावरून जात आहे हे पाहून आणि पुन्हा त्याच मार्गावरून दुसरे विमान येत असल्यास पूर्वीचे विमान ज्या उंचीवरून जात आहे, त्या उंचीवरून जाण्याची परवानगी दुसऱ्या विमानास देण्यात येत नाही.
 
साधारणतः विमान 33 हजार फूट उंचीवरून गेल्यास वातावरणातील दाबामुळे विमानास अतिरिक्त इंधनाची आवश्‍यकता भासते. अशा वेळी संबंधित ठिकाणच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला "रिपोर्ट' देताना पायलट 30 ते 33 हजार फुटांवरून विमान नेण्याची परवानगी मागतो. परंतु, त्यावेळी त्या मार्गाने तेवढ्या उंचीवरून दुसरे विमान जात किंवा येत नसल्यास त्यांना ही परवानगी देण्यात येते. एखादे विमान त्या मार्गाने असल्यास मात्र त्यांना परवानगी नाकारून त्यावरील उंचीवरून उडण्याची सूचना करण्यात येते. पूर्वी रडार यंत्रणा अस्तित्वात नसताना 80 माईल्सचे अंतर असल्याशिवाय दुसऱ्या विमानास त्या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात येत नव्हती. परंतु, रडार यंत्रणेमुळे 10 माईल्स अंतर असले तरी त्या मार्गाने दुसऱ्या विमानास जाण्याची परवानगी देण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रडार विभागात चार पाळीत 36 व्यक्ती काम करीत असून, ते चोवीस तासांत जवळपास 600 विमानांचे संचालन करतात. उत्तर हैदराबाद, भोपाळ, औरंगाबाद आणि पूर्व रायपूरपासूनचा भाग नागपूर विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अंतर्गत येतो. या अवकाशातून असणाऱ्या 10 मार्गाने दररोज जवळपास 600 विमाने ये-जा करतात. त्यांना योग्यप्रकारे सूचना देण्याचे काम एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाकडून करण्यात येते. कामात थोडीही हयगय झाल्यास आकाशात विमानांची टक्कर होण्याची भीती असल्यामुळे या विभागाचे काम महत्त्वाचे असून, कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते.

50 मिनिटानंतर हवा "ब्रेक'
एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये कामगिरी करताना एक कर्मचारी 50 मिनिटांपेक्षा अधिक काळ कामगिरी करू शकत नाही. एखाद्या मार्गाने येणारे विमान किती उंचीवरून येत आहे, त्याच मार्गावरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या विमानास किती फूट उंचीची परवानगी द्यावी हा सारा खटाटोप करताना 50 मिनिटांत त्यांचे डोके जड होऊन बसते. अशा परिस्थितीत "स्टॅंड बाय' म्हणून असलेले दोन कर्मचारी त्यांना थोड्या वेळासाठी "रिलिव्ह' करून त्यांचे काम सांभाळतात. पुन्हा काही वेळानंतर ते आपला मोर्चा सांभाळतात, अशी माहिती विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाचे प्रभारी अधीक्षक एम. अयुब यांनी दिली.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: