Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अर्थसंकल्पापूर्वीच राज्याने ओतले महागाईत तेल
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 17, 2010 AT 12:46 AM (IST)

पुणे - केंद्र सरकारपाठोपाठ राज्याचा अर्थसंकल्पही महागाईकडे वाटचाल करणारा असल्याची माहिती समोर आली आहे. शेड्यूल "सी'मध्ये अंतभूर्त असलेल्या ९७ विभागांतील विविध वस्तूंच्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) येत्या एक एप्रिलपासून चार टक्‍क्‍यांवरून पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय अर्थ विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात जाहीर केला आहे, तसेच उत्पादन शुल्कात दोन टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन आता लवकरच सुरू होत आहे. त्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. मात्र, त्या पूर्वीच राज्य सरकारच्या www.mahavat.gov.in या संकेतस्थळावर मूल्यवर्धित करात वाढ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व प्रकारची औषधे, अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, विविध प्रकारच्या मिठाई, पशुखाद्य, बियाणे, कपडे, बांधकाम साहित्य, संगणक आदी प्रमुख वस्तूंबरोबरच अनेक वस्तू महाग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेड्यूल "सी'मध्ये अंतर्भूत असलेल्या ११४ विभागांपैकी ९७ विभागांतील वस्तूंमध्ये या निर्णयाने वाढ होणार आहे.

तांदूळ, गहू, डाळीचे पीठ, आटा, रवा, मैदा, हळद, मिरची या वस्तूंवर १ मे २००६ ते ३१ मार्च २०१० पर्यंत करातून सवलत देण्यात आली होती. मात्र, या वस्तूंमध्ये १ एप्रिल २०१० पासून शून्य टक्‍क्‍यावरून चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होणार आहे. मिठाई, फरसाण, साबुदाणा या वस्तूंमध्ये चार टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांवर वाढ होणार आहे. सामान्यांच्या रोजच्या वापरातील खाद्यतेल व रेशनिंगवरील रॉकेलसहित अन्य सर्व वस्तूंवर चार वरून पाच टक्के वाढ झाली आहे.

---------------------------------------
कोणत्या वस्तू महागणार?
अन्नधान्य - तांदूळ, गहू, डाळीचे पीठ, आटा, रवा, मैदा, हळद, मिरची (शून्य वरून चार टक्के), साबुदाणा, खाद्यतेल, (चारवरून पाच टक्के)
कृषी विभाग - पशुखाद्य, बियाणे, शेती अवजारे, खते, ट्रॅक्‍टर ट्रेलर व त्याचे सुटे भाग, बांबू, विडीपाने, पंपसेट व पंपसेट फिटिंग
खाद्यपदार्थ - दुग्धजन्य पदार्थ, बेकरी प्रॉडक्‍ट, मिठाई, फरसाण
केरोसीन - रास्त धान्य दुकानातून शिधा पत्रिकेवर दिले जाणारे केरोसीन
कपडे - तयार कपडे व पादत्राणे
बांधकाम - वाळू, वीट, प्लॅस्टिकचे पाइप
इलेक्‍ट्रॉनिक - संगणक, इलेक्‍ट्रॉनिक वापराच्या वस्तू
अन्य वस्तू - सायकल, सेफ्टी माचीस, सोलापुरी चादर
औषधे - युनानी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, मानसिक स्वास्थ्यासाठी वापरली जाणारी औषधे अशा सर्व प्रकारची औषधे
उद्योग - औद्यागिक केबल्स, उच्चदाब, प्लॅस्टिक आवरण असलेल्या अथवा जेलीफिल्ड केबल, ऑप्टिकल फायबरसह वस्तूला आवरण करण्यासाठी वापरण्यात येणारे मटेरिअल (वेष्टण).
कागद - न्यूजप्रिंट, पेपर बोर्ड, संगणक पेपर, कार्बन व अमोनिआ पेपर
स्टेशनरी - पेन, पेन्सिल, शार्पनर, प्रिंटिंग व लिखाणाची शाई अशी सर्व प्रकारची स्टेशनरी
खेळ - खेळाचे साहित्य
इंधन - कोळसा, जळणाचे लाकूड
---------------------------------------


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: