इंदुमती लांडगे यांच्या "संध्यावेला'चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
Monday, June 07, 2010 AT 12:00 AM (IST)
पुणे - "काव्य निर्मितीसाठी जेवढी प्रतिभा लागते, तेवढीच प्रतिभा कवितेच्या आस्वादासाठी आवश्यक असते. आस्वाद घेताना वाचकाच्या मनात त्या कवितेची पुनर्निर्मिती होत असते,'' असे मत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी रविवारी व्यक्त केले.
पृथ्वीराज प्रकाशनतर्फे इंदुमती लांडगे लिखित "संध्यावेला' या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर आणि प्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण या वेळी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, "संवेदना, भावना याबरोबरच ज्ञान आणि मूल्य या घटकांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य कवितेत असते. मानवी भावना काव्यातून प्रभावीपणे व्यक्त होतात. प्रांजळपणा आणि कल्पनांचा मेळ असलेली कविता म्हणजे भावनांची चौकट नव्हे, तर आयुष्याचे अंतरंग दाखविणारी खिडकी असते.''
या वेळी शिकारपूर, चव्हाण आणि लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.