Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

"काव्य म्हणजे भावनांचे अलगूज'
सकाळ वृत्तसेवा
Monday, June 07, 2010 AT 12:00 AM (IST)

पुणे  -  "काव्य म्हणजे केवळ व्याकरण नाही, तर भावनांचे अलगूज असते. त्यातून निर्माण होणारे सूर मनात रेंगाळतात. रेंगाळणारे सूर विचाराला चालना देतात आणि त्याचे प्रतिबिंब आचरणात पडते,'' असे मत "सकाळ'चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांनी रविवारी व्यक्त केले.

"आर. पी. आयडियाज'तर्फे रवी पाईकलिखित "कुठला श्रावण कुठल्या सरी' या कवितासंग्रहाचे प्रकाशन उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी पाध्ये बोलत होते. समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे आणि प्रसिद्ध कवी-गजलकार अनिल कांबळे या वेळी उपस्थित होते.

पाध्ये म्हणाले, ""कविता एकदा लिहिली, की ती कवीची न राहता वाचकांची होते. वाचक आपल्या परीने त्याचा अर्थ लावतात. कित्येकदा वाचकाने लावलेला अर्थ कवीलादेखील अभिप्रेत नसतो, याची उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळतात.''

पवार म्हणाले, ""पाईक यांच्या कवितेमध्ये सामाजिक जाणिवा आणि गावगाड्यातील माणसांच्या व्यथा-वेदना आहेत. लोकसंस्कृतीतील शब्दांचा वापर केल्यामुळे कविता अस्सल झाली आहे.''

कुदळे म्हणाले, ""पाईक यांच्या कवितांमध्ये कल्पनारम्यता नाही; तर त्यामध्ये वास्तवाचे भान दिसते. "जे न देखे रवी ते देखे कवी' असे म्हणतात. इथे रवी हाच कवी आहे.''
या वेळी कांबळे, पाईक यांनी मनोगत व्यक्त केले. नीता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात प्रसिद्ध गजलकार इलाही जमादार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात प्रकाश घोडके, राजेंद्र शहा, धनंजय सोलनकर, सुनीती लिमये, स्वाती मेहेंदळे, भरत दौंडकर आणि माधव हुंडेकर यांनी सहभाग घेतला.




आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: