Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'व्यक्तिमत्त्व विकासात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व'
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: ajit pawar,   personality,   pune

पुणे - शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासालाही तितकेच महत्त्व असते. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने खेळाला खूप महत्त्व येते. त्यामुळेच जनतेच्या सुरक्षेसाठी अविरत झटणाऱ्या होमगार्डससाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय होमगार्ड क्रीडा स्पर्धेची कल्पना प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, खेळाच्या माध्यमातून पराभव पचविण्याची क्षमता निर्माण होते. धैर्य, चिकाटी, आत्मविश्‍वास आणि आक्रमकता या गुणांचा विकास होतो. या स्पर्धेमुळे होमगार्ड संघटनेमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्याचा दर्जा वाढेल. तसेच देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूही मिळतील.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या 30 जिल्ह्यांतील सहा विभागांतील खेळाडूंनी शानदार संचलन केले. पुण्याचा राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू तुषार गाडेकरने आणलेली ज्योत अजित पवारांकडे दिल्यानंतर त्यांनी क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले. त्यानंतर खेळाडूंच्या वतीने तुषार वरांडेने शपथ घेतली. या वेळी पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल, निवृत्त महासमादेशक सुप्रभा चक्रवर्ती, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, आमदार लक्ष्मण जगताप, अजित पारसनीस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपमहासमादेशक बी. एन. राऊत यांनी केले. प्रवीण आहुजा यांनी आभार मानले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: