रोनाल्डो चिडतो तेव्हा...

पोर्ट एलिझाबेथ - फुटबॉलचा सामना तोही विश्वकरंडक स्पर्धेचा. अशावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देताना उपस्थित प्रेक्षकांनी गोंधळ केला नाही तरच नवल. दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेतही हा अनुभव येत आहे. प्रेक्षक "वुवुझेला' (ट्रम्पेटसारखे वाद्य) घेऊन मैदानात येत आहेत. हे वाद्य वाजविण्याचा आनंद प्रेक्षक उत्साहात लुटत असले, तरी त्याच्या आवाजाने अन्य प्रेक्षक नाही, पण खेळाडू निश्चित त्रस्त झाले आहेत.
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तिआनो रोनाल्डो तर भयंकर चिडला. त्याने याविषयी उघडपणे आपला संताप व्यक्त केला. रोनाल्डो म्हणाला, ""याचा आवाज इतका कर्कश्श आहे की, त्याचा त्रास होतो. त्यापेक्षा खेळाडूंची एकाग्रता भंग पावते. अशा आवाजात खेळाडूंना एकचित्ताने खेळणे कठीण आहे.''
या वाद्याच्या आवाजाची पातळी 127 डेसिबल इतकी मोजली गेली आहे. ही नक्कीच खूप आहे. त्यामुळेच सध्या "वुवुझेला' स्पर्धेत वापरण्यात येणाऱ्या "जाबुलानी' चेंडूइतकेच वादग्रस्त ठरत आहे. रोनाल्डो म्हणतो, ""प्रेक्षकांनी हे वाद्य वाजवू नये असे आम्हाला मुळीच वाटत नाही. आम्ही त्यांचा आदर करतो. पण, हे वाद्य केवळ ज्यांना वाजवता येते त्यांनाच आवडते. इतरांना त्याच्या आवाजाचा त्रास होतो हे त्यांनी लक्षात घ्यावे.''
अर्थात, या आवाजाचा आपल्या खेळावर परिणाम होणार नाही, अशी पुष्टीही त्याने पुढे जोडली. तो म्हणाला, ""आता हा आवाज येतच राहणार. त्यामुळे त्याची सवय करून घेतली आहे. उद्या अशा आवाजातही माझा खेळ चांगलाच होईल.''