डोमिसाईल सक्तीशिवाय होणार तंत्रशिक्षण प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
मुंबई - अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) सक्ती पुढील वर्षापासून लागू करण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असून, यंदाची तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया गेल्यावर्षीप्रमाणेच होणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया 21 किंवा 22 जूनपासून आणि औषधनिर्माणशास्त्राची प्रवेशप्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होईल, असे प्रभारी तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी "सकाळ'ला सांगितले. आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. वासुदेव तायडे यांनी दिली.
डोमिसाईल सक्तीवरून यंदा वाद निर्माण झाला होता व यंदाच्या वर्षीपासून ती लागू न झाल्यास प्रवेशप्रक्रिया उधळून लावण्याचा इशारा मनविसेने दिला होता; पण डोमिसाईल प्रमाणपत्राची अट पुढील वर्षापासून लागू होईल. अभियांत्रिकीसाठी 85 हजार 141 जागा असून, औषधनिर्माण शास्त्राच्या 8 हजार 345 जागा आहेत. या जागांमध्ये अजून 15 ते 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे तंत्रशिक्षण संचालकांनी सांगितले.
सहा स्वायत्त अभियांत्रिकी संस्थांची प्रवेशप्रक्रिया 11 जूनपासून सुरू झाली असून, बारावी परीक्षेत पीसीएममध्ये 50 टक्के व सीईटीत कमीतकमी 110 गुण (महाराष्ट्रातील मागासवर्गीयांसाठी पीसीएम 45 टक्के, सीईटी 100 गुण) अशी किमान पात्रता आहे. प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 29 जून रोजी सुरू होत आहे. या सहा स्वायत्त संस्थांमध्ये 2 हजार 565 इतकी प्रवेशक्षमता आहे.
अभियांत्रिकी, फार्मसीच्या वाढीव जागांना व नवीन महाविद्यालयांना एआयसीटीई व फार्मसी कौन्सिलकडून मान्यता आलेली नाही. त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असून, 15 ते 20 हजारांनी जागा वाढतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांकडून प्रेफरन्स फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया ग्रॅंट महाविद्यालय (मुंबई), बी. जे. महाविद्यालय (पुणे), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (औरंगाबाद) या चार विभागीय प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयात केली जाणार आहे. याबाबतची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण संचालकांनी सांगितले.