राज्याला सरकारी स्तरावर ३४, ३०० इतक्या लस
वैशाली भुते vaishalu@gmail.com
Tuesday, June 15, 2010 AT 11:36 AM (IST)
पुणे - स्वाईन फ्लूवरील लसीचे ३४, ३०० डोस आतापर्यंत राज्याला केंद्र सरकारने पुरविले आहेत. स्वाईन फ्लूच्या रुग्णांशी सातत्याने संपर्कात असणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना आणि कर्मचाऱ्यांना या लसीची मात्रा देण्यात आली आहे. ही लस सामान्य नागरीकांना आतापर्यंत उपलब्ध झालेली नाही. अहमदाबादच्या "कॅडिला हेल्थकेअर'ने स्वाईन फ्लूवरील लसीचे उत्पादन सुरू केले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही स्वतंत्रपणे लस उत्पादन केलेले आहे. लसीसंदर्भात "सिरम'ची अन्न आणि औषध प्रशासनासोबत बैठकही झाली. तथापि, बैठकीचा तपशिल समजू शकला नाही.
आतापर्यंत राज्यात स्वाईन फ्लूचे सात हजार १२० रुग्ण मिळाले. त्यापैकी ४७१ मृत्युमुखी पडले असून या मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे २४१ मृत्यू पुण्यातीलच आहेत. मागील वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत संशयित आणि बाधित रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. त्याचबरोबर तपासणी केंद्रेही सुरू केली आहेत. सध्या राज्यात ११४ विलगीकरण कक्ष आणि १४९७ तपासणी केंद्रे आहेत.
आठ जून २०१० अखेरपर्यंतची राज्यातील स्वाईन फ्लूची परिस्थिती अशी -
एकूण तपासलेले रुग्ण - २५, ७२,०६७
टॅमिफ्लू दिलेल्या संशयित रुग्णांची एकूण संख्या - १, २, ४९८
एकूण स्वाईन फ्लू बाधित रुग्ण - ७, १२०
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण - ६, ६३१
एकूण मृत्यू - ४७१
राज्यातील तपासणी केंद्रे - १, ४९७
राज्यातील एकूण विलगीकरण कक्ष - ११४
...........
जिल्ह्यानुसार स्वाईन फ्लूची माहिती
जिल्हा स्वाईन फ्लू बाधित रुग्ण मृत्यू
पुणे ३, ४, १३ २४१
मुंबई १, ७७८ ३१
नाशिक ३५४ ४९
नागपूर १८२ ४८
औरंगाबाद १०६ २२
सोलापूर ३८ १५
लातूर २२० ९
सांगली ३४ ९
धुळे १९२ ९
सातारा ८२ ५
नांदेड ३२० ९
मागील वर्षी (२००९)जून महिन्यात स्वाईन फ्लचा एकही रुग्ण आढळला नव्हता. जुलै महिन्यात ही संख्या वाढून १२९ झाली. या महिन्यात मृत्यूचे प्रमाण शून्यावर होते. ऑगस्ट महिन्यात रुग्णांच्या प्रमाणाबरोबरच मृत्यूचे प्रमाण वाढून अनुक्रमे १६१०, ५६ झाले. सप्टेंबर महिन्यात १५५३ इतके रुग्ण आढळून आले. त्यापैकी ७८ जणांचा मृत्यू झाला. ऑक्टोबरमध्ये ही संख्या घटून अनुक्रमे ८९५, ७२ एवढी झाली. नोव्हेंबरमध्ये आणखी घट झाली. या महिन्यात ४११ रुग्ण आढळले. त्यापैकी २२ जणांचा मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये ६७२ रुग्ण आढळले. त्यापैकी ४२ मृत्यू पावले. जानेवारी २०१०पासून ही संख्या सातत्याने रोडावत राहिली. जानेवारीत ५५४ रुग्णांपैकी ४९ रुग्ण मृत्युमुखी पडले. फेब्रुवारीत ४७९ बाधित रुग्ण आढळले. त्यातील ५१ दगावले. तर, मार्चमध्ये ३९३ पैकी ४७ जणांचा मृत्यू झाला. एप्रिल आणि मेमध्ये रुग्णांची संख्या अनुक्रमे २४५ (३० मृत्यू), १४३ (२१) इतकी होती. जूनमध्येही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत असून आठ जूनपर्यंत २८ रुग्ण आढळले आहेत. त्यातील पाच जण मृत्यू पावले आहेत.
विमाननगर येथील २३ वर्षीय युवक स्वाईन फ्लूचा पुण्यातील २४३ वा बळी ठरला. सध्या पुणे जिल्ह्यातील २१ रुग्ण विविध रुग्णालयात स्वाइन फ्लूवर उपचार घेत आहेत. त्यातील दोन जणांवर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. २१ पैकी १६ जण संशयित असून सहा जणांच्या चाचण्यात एच१एन१ चे विषाणू आढळून आले आहेत.