कुडाळ सरपंचांवर दिशाभुलीचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
कुडाळ - येथील सरपंचांनी पालकमंत्री नारायण राणे यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप पत्रकातून ग्रामपंचायत सदस्य राजन नाईक यांनी केला.
त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्री राणे यांनी शनिवारी (ता. 12) ग्रामपंचायतीला भेट दिली. शहरामध्ये आम्ही सर्व विरोधी सदस्य पालकमंत्री यांचे स्वागत करतो; मात्र पालकमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती सरपंचांनी आम्हाला दिली नाही. सरपंचांनी चार ते पाच सदस्यांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. काही सत्ताधारी सदस्यसुद्धा या बैठकीला उपस्थित नव्हते. विरोधी सदस्य यापूर्वीच झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती व कुडाळ सरपंचांचा कारभार कसा चालतो, याची माहिती पालकमंत्री राणे यांना देतील, या भीतीने त्यांना या चर्चेमध्ये सामावून घेतले नाही. कुडाळ ग्रामपंचायतीचे किती सदस्य आहेत, याचे अचूक उत्तर सरपंचांना देता आले नाही. सरपंचांनी अठरा सदस्य असे उत्तर दिले. कुडाळ ग्रामपंचायतीचे सतरा सदस्य असताना अठरावा सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून घेतला की काय व हा सदस्य ग्रामपंचायत चालवितो काय, असा प्रश्न पत्रकात उपस्थित केला आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, आजपर्यंत विरोधी सदस्यांनी विकासकामांसाठी कधीही विरोध केला नाही. विकासकामांच्या बाजूने विरोधी सदस्य राहिलेले असतानाही ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल, अशा कामांना विरोधकांनी मंजुरी दिलेली नाही. सरपंचांनी अडीच वर्षाच्या कालखंडात किती विकासकामे झाली व बाहेरून निधी आणून किती विकासकामे केली, याचा तपशील द्यावा. विकासकामांचे ठराव बहुमताने घेऊनही त्याची पूर्तता होत नाही किंवा त्याचा पाठपुरावा केला जात नाही. अजूनही सरपंच अज्ञान प्रकट करीत आहेत. पालकमंत्री येण्यापूर्वी ग्रामपंचायतीला टाळे होते. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना बाहेर थांबावे लागते. त्यांना वाट पाहावी लागते, हे दुर्भाग्य आहे. पालकमंत्री येण्यापूर्वी स्वागत करण्यासाठी सरपंच व सर्व सदस्य यांनी उपस्थित राहिले पाहिजे होते; परंतु तसे झालेले नाही. बाराव्या वित्त आयोगातील भ्रष्टाचार घेऊन जो शिल्लक निधी आहे, त्यात विकासकामे करण्यासाठी सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. त्यानंतर जाहीर निविदा काढूनसुद्धा कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाहीत. त्यामुळे कारभारातील त्रुटी समोर येतात, असा आरोपही पत्रकातून केला आहे.