Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मठचे विद्युतीकरण कार्यकारी अभियंत्यांना भोवले
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: konkan,   mseb,   electricity

सावंतवाडी - मठ (ता. वेंगुर्ले) येथे वन विभागाच्या जागेत विनापरवाना विद्युत खांब घातल्या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंतांसह तिघांवर वन विभागाने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. संबंधितांवर निलंबनाचीही कारवाई प्रस्तावित होऊ शकते, असे उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांनी सांगितले.

मठ-धनगरवाडीत बऱ्याच वर्षांपासून विजेची मागणी होती. काहीशा आडवाटेला असलेल्या मठ-धनगरवाडीवर वर्षानुवर्षे अंधार होता. वाडीवर वीजपुरवठा व्हावा, यासाठी ग्रामस्थांची मागणी होती. वारंवार प्रयत्न करूनही गावचा प्रश्‍न सुटत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रयत्न चालविले होते. अखेरीस ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आणि मठ-धनगरवाडीच्या विद्युतीकरणाचा मार्ग मोकळा झाला. सततच्या पाठपुराव्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाला याची दखल घ्यावी लागली; पण यासंबंधीची कार्यवाही करताना वीज वितरण कंपनीकडून पुरेशी दक्षता घेण्यात आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाला मंजुरी देणाऱ्या कार्यकारी अभियंतांसह कनिष्ठ अभियंता ए. एच. चितावार, श्री. सोनावणे अडचणीत आले आहेत.

याबाबत श्री. चितावार म्हणाले, ""मठ-धनगरवाडीला वीजपुरवठा करण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना आल्या. म्हणून वीज वितरण कंपनीने विद्युतीकरणाचे काम तातडीने हाती घेतले. सुरवातीला विद्युत खांब घालण्याचे नियोजन होते. विद्युत खांब ज्या ठिकाणी उभे केले जाणार होते, ती जागा वन विभागाची असल्याची कल्पना नव्हती. कनिष्ठ अभियंता सोनावणे यांच्याकडे मठ विभागाचा कार्यभार होता. दरम्यानच्या काळात ते रजेवर गेल्याने अतिरिक्त कार्यभार सांभाळत होतो. त्या वेळी धनगरवाडीत सोळा विद्युत खांब घालण्यात आले. यासंबंधीचे काम दहा दिवस सुरू होते; मात्र त्या वेळी कुणीही कामाला हरकत घेतली नाही. नंतर काम पूर्ण झाल्यावर संबंधित जागा वन विभागाची असल्याचे सांगितले गेले. याबाबत उपवनसंरक्षक कार्यालयाने पत्र दिले आहे. त्यांनी कार्यकारी अभियंतांसह सर्व संबंधितांना जबाबदार धरले आहे.''

ते म्हणाले, ""याबाबत उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांची भेट घेण्यासाठी सावंतवाडीला गेलो होतो; मात्र त्यांचे सेमिनार असल्याने भेट झाली नाही. आता पुन्हा वीज कंपनीचे अधिकारी त्यांच्याशी चर्चेकरिता जातील.'' श्री. झुरमुरे म्हणाले, ""वन विभागाकडून रीतसर परवानगी मिळविणे शक्‍य होते; परंतु तसे न करता परस्पर विद्युत खांब उभे करण्यात आले. स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. यामध्ये वनअधिनियमाचा भंग झाला आहे. त्यामुळे निलंबनाचीही कार्यवाही प्रस्तावित होऊ शकते. दोन्ही बाजू समजून घेऊन कार्यवाही केली जाईल.''


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: