
नवी दिल्ली - फाशीची शिक्षा रद्द करून मला जन्मठेप द्यावी, अशी विनंती 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील प्रमुख आरोपी अजमल अमीर कसाब याने सर्वोच्च न्यायालयाला आज (मंगळवार) केली.
कसाबची बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अधिवक्ते राजू रामचंद्रन यांची नेमणूक केली आहे. ते म्हणाले, ""कसाबला फाशी द्यावी की देऊ नये याचा निर्णय घेताना त्याला जिवंत ठेवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा न्यायालयाने विचार करू नये. कसाबच्या मागणीप्रमाणे न्यायालयाने त्याची फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा बजावावी. धार्मिक द्वेष भडकावून आणि चुकीची शिकवण देऊन त्याला प्रभावित करण्यात आले होते. वयाने तरुण असल्याने तो याचा बळी ठरला. एकीकडे कसाबला फाशीची शिक्षा बजावली जात आहे, तर दुसरीकडे ज्यांनी दहशतवादी हल्ला घडवून आणला त्यांना कधीही शिक्षा होण्याची शक्यता नाही.''
दहशतवाद विरोधी न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गोपाळ सुब्रमण्यम उद्या महाराष्ट्र सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडतील.