|
मुंबई -   आजच्या युगात माणूस प्लॅस्टिकची पिशवी झाला आहे. आपल्या जगण्याला बळच नाही मात्र भागवत महापुराणातील ताकद आपल्याला जगण्याला बळ देते, असे प्रतिपादन संत साहित्याचे निरुपणकार डॉ. यशवंत पाठक यांनी आज येथे केले. महर्षि वेदव्यासप्रणित भागवत महापुराण मराठी समश्लोकी ग्रंथाचे प्रकाशन आज येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. सत्यसंध बर्वे यांनी ही समश्लोकी लिहिली असून ग्रंथालीतर्फे तिचे प्रकाशन करण्यात आले. वर्तमानाचा नवा श्वास देणारा तसेच जगण्याच्या व्यवस्थापनाचे वर्णन करणारा भागवत हा सर्वोत्तम ग्रंथ आहे. आज आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यापैकी काहीही धड जगता येत नाही. अशा वेळी वर्तमानाचा प्रत्येक क्षण जिवंत कसा करावा, हे भागवत आपल्याला शिकवतो. त्यामुळे भागवत हा वर्तमानाचा ग्रंथ आहे, असे सांगून डॉ. पाठक म्हणाले, की जगण्यातील स्वाभाविकता अशी भक्तीची व्याख्या या ग्रंथात आहे. आपली सहजता ही आपल्या कृती आणि उक्तीतून सहजतेने व्यक्त व्हावी, ही शिकवण देणारा भागवत हा सर्वोत्तम राष्ट्रीय ग्रंथ आहे. त्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे.
Monday, September 06, 2010 AT 09:30 AM (IST)
|