|
पॅरीस/ लंडन -  संपामुळे पॅरिस आणि लंडन या युरोपमधील दोन प्रमुख शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मंगळवारी दिवसभर विस्कळित होती. अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ संपूर्ण फ्रान्समधील सार्वजनिक वाहतूक कर्मचारी संघटनांनी लाक्षणिक संप केला, तर कर्मचारी कपातीच्या निषेधार्थ लंडनमधील भुयारी रेल्वेसेवा आज बंद होती. फ्रान्समध्ये अध्यक्ष सार्कोझी यांच्या विरोधात वातावरण तापत असून, त्यात आता निवृत्तीचे वय वाढविण्याच्या प्रस्तावाची भर पडली आहे. निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्याबाबत अध्यक्ष सार्कोझी आग्रही आहेत. आयुर्मर्यादा वाढल्याने हे पाऊल उचलणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात जर्मनीचा दाखला दिला जातो. तेथे निवृत्तीचे वय 65 वरून 67 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपामुळे रेल्वे, विमान, बससेवा कोलमडली. शाळा ओस पडल्या. पॅरिसला येणारी 25 टक्के विमानोड्डाणे रद्द करण्यात आली. अतिजलद रेल्वे गाड्यांवरही संपाचा परिणाम झाला.
Wednesday, September 08, 2010 AT 09:45 AM (IST)
|