|
सकाळ न्यूज नेटवर्क नवी दिल्ली -  पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसशी आघाडी न झाल्याने संतप्त झालेल्या रेल्वेमंत्री, तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा प्रणव मुखर्जी यांना लक्ष्य केले आहे. कॉंग्रेसने मात्र हा ममतांचा मतभेद व्यक्त करण्याचा प्रकार असून, स्थानिक पातळीवर कुरबूर असली तरी केंद्रातील दोन्ही पक्षांची आघाडी अभेद्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. मुलायमसिंह यांना सोबत घेऊन ममतांना डच्चू देण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या वृत्ताचाही कॉंग्रेसने इन्कार केला आहे. 'यूपीए-2'साठी कॉंग्रेसने 'तृणमूल'ची सोबत घेतली असली, तरी दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने चकमकी झडत असल्याचे चित्र आहे. रेल्वे मंत्रालयाच्या विशेष महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या जमीन अधिग्रहण करण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यास अर्थमंत्रालयाने स्पष्टपणे नकार दिल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत ममतांची प्रणवदांशी खडाजंगीही झाली होती. तर संसद अधिवेशनादरम्यान महागाई, इंधन दरवाढ यांसारख्या मुद्यांवर ममतांची भूमिका सातत्याने सरकारच्या धोरणांना छेद देणारी राहिली.
Tuesday, May 11, 2010 AT 10:00 AM (IST)
|